पुणे - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात काही नामांकित लोकांची नावे प्रसार माध्यमांमध्ये व सोशल मीडियामध्ये प्रसारित होत असूनसुद्धा या प्रकरणात अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल न झाल्याने आता पुण्यातून गुन्हा दाखल होण्याची मागणी होऊ लागली आहे. पूजा चव्हाण हिची हत्या करण्यात आली अथवा तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, याबाबत कोणताही शोध न घेता गुन्हा दाखल न करता तपास केलेला नाही. विशेष म्हणजे यात एका मंत्र्याचे नावे समोर आले आहे. संबंधित मंत्र्याचा ठावठिकाणा नाही. या सगळ्याबाबत पुण्यातील वकील विजयसिंह ठोंबरे व त्यांच्यासोबत काही वकिलांनी एकत्र येत वानवडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी - pune crime news
पुण्यातील वकील विजयसिंह ठोंबरे व त्यांच्यासोबत काही वकिलांनी एकत्र येत वानवडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
'न्यायालयाचे दरवाजे ठोठावू'
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174अन्वये दाखल करण्यात आलेल्या अनैसर्गिक मृत्यूच्या नोंदीनंतर अनेक संशयितांची नावे समोर येऊनदेखील गुन्हा दाखल न करता योग्य तो तपास केला नसल्याची बाब अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितली आहे. तसेच गुन्हा दाखल करून नि:पक्षपाती तपास केल्यास पुरावा समोर येऊन दोषी व्यक्तीला शिक्षा आणि मृत्यू झालेल्या पूजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी काहीही कारवाई न केल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावत न्याय मिळवून देऊ, असेदेखील या वकिलांमार्फत सांगण्यात आले आहे. सुशांत प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे, तसा या प्रकरणात दाखल करावा अन्यथा आम्ही कोर्टात धाव घेऊ, असे वकिलांनी सांगितले आहे.