पुणे -कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले, असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये चंद्रकांत पाटलांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात पाटील यांच्या विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व तक्रार काढून टाकत खटला निकाली काढला आहे.
न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले-
तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना पाटील यांचे विरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पाटील यांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले. तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांत कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील ज्या पदांवर पदसिद्ध होते. त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले, असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे ही निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध कोल्हापूरच्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.