पुणे - कोरोनामुळे सर्वच समाजाच्या सणांवर बंधने आली आहेत. मुस्लिम धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे रमजान. या महिन्याची सर्वजण आवर्जून वाट पाहत असतात. परंतू, यावर्षी कोरोनाचे सावट या सणावरही असल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षी पहाटेपासूनच मशिदींसह मोमीनपुरा, कोंढवा आदी मुस्लीमबहुल भागात असणारा गाजावाजा यावर्षी दिसत नाही. दरवर्षी या महिन्यात, मशिदींवर रोषणाई केली जाते. संध्याकाळी उपवास (इफ्तार) सोडल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे दुकाने लागत; ज्यात चहा, फळे, कपडे, चप्पल, महिलांसाठी दागदागिने अशी विविध दुकाने असत. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
हेही वाचा...औरंगाबाद दुर्घटना : पहाटे नेमकं काय घडलं, ऐका स्थानिकांकडून..
मोमीनपुरा येथे गेल्या 35 वर्षांपासून साधारणतः 100 ते 150 छोटे मोठे दुकान लागतात. रात्रभर ही दुकाने सुरु असल्यामुळे या ठिकाणी जत्रा भरल्याचे स्वरूप येते. मोठ्या प्रमाणात नागरिक येथे गर्दी करतात. मुस्लीम समाजाव्यतिरिक्त इतर समाजाचे बांधव देखील या ठिकाणी येऊन खाद्य प्रदार्थांचा आस्वाद घेतात. परंतु यावर्षी कोरोनातच्या पार्श्वभीमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे येथील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.