पुणे -ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने शहरात 'राजकारणाच्या पलिकडे' (Beyond Politics) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी मागील 6 वर्षांत अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच देशात नव्याने उदयाला येणाऱ्या धार्मीक राष्ट्रवादावर सनसणीत टीका केली आहे.
शशी थरुर म्हणाले, 'तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असलात तरी सर्वांना भारतात राहण्याचा अधिकार आहे. मात्र, मागच्या सहा वर्षांत आपण काय पाहत आहोत, आखलाकच्या घरात गोमांस आहे की नाही? हे पाहण्यासाठी एक झुंड त्यांच्या घरात शिरतो आणि त्यांना जीवे मारतो. पहलू खानच्या बाबतीतही तेच घडते. असाच प्रकार तबरेज खानच्या बाबतीतही समोर येतो, 'जय श्रीराम'चा नारा दिला नाही म्हणून त्याला जीवे मारले जाते. हा आपला भारत आहे? हिंदू धर्माचा असा उपदेश आहे? हा हिंदू धर्माचाच नाही तर श्रीरामाचाही अपमान आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.'
हेही वाचा -काँग्रेस आक्रमक : राज्य सरकारने १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातही मुसलमान होते. त्यांनी आपल्या सैन्याला सांगितले होते की, कोणत्याही धर्माचा अपमान करू नका. हिंदू धर्माच्या नावाखाली जे कोणी चुकीचे कामे करत आहेत ते हिंदू नाहीत. किंवा त्यांना हिंदू म्हणून घेण्याचा कुठलाही हक्क नाही. असे म्हणत थरूर पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या नावाखाली जे हिंदू धर्माला बदनाम करीत आहेत, ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठीच हे करीत आहेत. तुमच्या विरोधकांना शत्रूंना तुम्ही पाकिस्तानला जायला सांगता, कॅनडा ला का नाही? यावरून 'तुमची' विचारसरणी लक्षात येते. अशी सनसणीत टीका शरूरनांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात केली आहे.
संपुर्ण भारताने 1965 चे त्रै-भाषिक धोरण अवलंबले पाहिजे. केवळ एक भाषा देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही. भाजपचे राजकारण केवळ हिंदी आणि हिंदू या भोवतीच चालते. त्यामुळे त्यांना दक्षिण भारतात 'मते' मिळत नाहीत. एक देश एक भाषा धोरण केल्यास भारतातील विविध भाषिक लोकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे होईल. असे म्हणून थरूर पुढे म्हणाले, युपीए सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत होती. मात्र, आता तीची परिस्थिती बिकट झाली आहे. दरम्यान, भाजपकडून असेच राजकारण होत राहिल्यास देशाची अवस्था बिकट होईल अशी भिती देखील त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या कार्यक्रमाला काँग्रेस प्रवक्ते संजय झा, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.
हेही वाचा -...अन् थापाड्यांचे पाय लटलटले! भाजपच्या व्यंगचित्राला मनसेचा 'करारा जवाब'