पुणे - दिवाळीच्या निमित्ताने ठिकठिकाणी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन भरविले जाते. पण पुण्यात मात्र एक आगळेवेगळे प्रदर्शन भरविले गेले आहे, तेही कैद्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे. येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळी सणानिमित्त प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात विविध वस्तूंचा समावेश
येरवडा जेलच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात कंदील, पणत्या, सागवानी लाकडी वस्तू, पैठणी, कुर्ता, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी यासह ७० वस्तू प्रदर्शनात माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कमी सवलती चांगल्या दर्जाच्या या वस्तू असून पुणेकरांनी त्या खरेदी कराव्यात, असे आवाहन अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. हे प्रदर्शन दहा दिवस सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य
येरवडा कारागृहातील कैद्यांमार्फत तयार केलेल्या वस्तूंची विक्री येथील दालनात वर्षभर होत असते. कैद्यांकडून उत्तम दर्जाच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. करोना महामारीच्या काळात सर्वाधिक नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कैद्यांच्या वस्तू ऑनलाइन कशा विकता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असेदेखील यावेळी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.