पुणे -घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हा काही तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चिंचवड पोलिसांनी आरोंपीकडून १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. चिंचवडमधील हर्षदा सोसायटी मधून घरफोडी करत ५० तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केला.
चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (वय-२६), बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (वय -२२), कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (वय-२२) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. यातील चंद्या हा तडीपार असून त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. तर शशिकांत याच्यावर १७ व कमलेश याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. चिंचवडमधील हर्षदा सोसायटी येथे चोरट्यांनी घरफोडी करत ५० तोळे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना यातील तडीपार आरोपी वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोल पंपाजवळ फिरत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक सुधाकर अवताडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अधिक तपास केला असता त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.