पुणे - गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde attended meeting of Ganeshotsav Mandal ) दिले. यावेळी बैठक झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांशी चर्चा केली असता विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की, पहिला मुख्यमंत्री आम्ही असा बघितला की ज्यांनी गणेशोत्सव सुरू होण्याआधी आमची बैठक घेतली आणि आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत करतो, असे यावेळी मंडळांच्या अध्यक्षांनी मत व्यक्त केलं आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांना 10 हून अधिक मागण्या गणेश मंडळांनी केल्या होत्या. ते त्यांनी मान्य केल्या आहे. एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो. तेव्हा त्याला गणेश मंडळाची समस्या माहित असते आणि हेच लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमची बैठक घेतली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या, असे यावेळी पुण्यातील प्रमुख मंडळ तसेच इतर मंडळांच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.