पुणे -दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे गेल्यावरच युती तुटली हे खरं आहे. पण युती ही निवडणुकीनंतर झाली आणि 5 वर्ष सुखाने संसारही झाला. एकत्रित सरकार असताना देखील तुम्ही 'सामना'मधून शिव्या आणि शाप देतच होतात. तरीही एकत्रित संसार चालला केंद्रातही आणि राज्यातही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना लगावला आहे. शिवसेना (Shivsena) फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळली होती, असे वक्तव्य संजय राऊत यांनी रविवारी केले होते.
गोपीनाथ मुंडे असते तर ते आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट असती. परंतु आज जे आमचे नेते आहेत. त्यांचेही प्रयत्न हा युती टिकवण्यासाठीच राहिला, असे यावेळी पाटील म्हणाले. वाराणसी येथील विकास प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत भाजपतर्फे देशभर 'दिव्य काशी भव्य काशी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मांजराई देवी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी फॅक्ट मांडली -
रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटले ते त्यांनी फॅक्ट मांडली आहे. त्याचे मन एवढे गदरु नाही. आपल्या संस्कृतीत एकमेकांचे दुष्मन असलो तरी प्रत्येक प्रसंगाला काय करायचे ते माहिती आहे. वाढदिवसाला शुभेच्छाच द्यायच्या असतात. म्हणून फडणवीस यांनी शुभेच्छाच दिल्या आहेत. असे देखील पाटील म्हणाले.