पुणे-कोरोना विषाणू विषयी शासनातर्फे विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. जनजागृतीसाठी व्यंगचित्रकार देखील पुढे आले आहेत. तरुण आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार यामध्ये सहभागी झाले आहेत त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय.
घराबाहेर कोरोना विषाणूसारखी दिसणारी रांगोळी काढल्यामुळे घरात न येणारी माणसे, कोरोनाच्या संघर्षामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणार्यांची आपुलकीने विचारपूस करणारा आणि त्यांचे धन्यवाद मानणारा आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन, सामाजिक जाणीव न ठेवता रस्त्यावरून कुत्र्यांसोबत मॉर्निंग वॉक करणारी गाढवाच्या डोक्याची माणसे अशा एकाहून एक नवनवीन कल्पना आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून कागदावर उतरवून शहरातील अनेक व्यंगचित्रकार कोरोनासंदर्भात जनजागृती करीत आहेत. घरात राहून हे कलाकार अप्रत्यक्षपणे कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभागी झाले आहेत. व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, विश्वास सूर्यवंशी, रवि राणे, योगेश चव्हाण, धनराज गरड यांच्यासह अनेक तरुण आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार यामध्ये सहभागी झाले.