पुणे-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुण्यातील खंडूजीबाबा चौक ते गुडलक चौकदरम्यान हा कँडल मार्च काढण्यात आला.
कँडल मार्चमध्ये आमदार चेतन तुपे यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. चेतन तुपे आणि महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळेंनी या मार्चचे नेतृत्व केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कॅंडल मार्च; हाथरस येथील बलात्काराचा जोरदार निषेधार्थ - चेतन तुपे न्यूज
चेतन तुपे आणि महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळेंनी या मार्चचे नेतृत्व केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला.
चेतन तुपे म्हणाले, की भगिनीवर उत्तर प्रदेशमध्ये अमानुष अत्याचार झाले. घटना घडूनही १५ दिवसानंतर न्याय नाही. कोरोनाच्या काळातही उत्तरप्रदेशमधील निर्भयाला न्याय देण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. योगी सरकार अपयशी ठरले आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत. योगी सरकार हे सत्तेचा मस्तवालपणा दाखवित आहे. आज घटनास्थळी जाणाऱ्या खासदाराला तेथील पोलिसांनी अमानुष वागणूक दिली. पुढे तुपे म्हणाले, की संसदेतील लोकप्रतिनधीला अशी वागणूक पोलीस देत आहेत, तर सामान्यांचे काय हाल होत असतील...घटनेतील दोषींबरोबर योगींना शासन व्हावे, अशी आमची मागणी आहे. जनाची नाही, मनाची लाज असेल तर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा घ्यावा. राष्ट्रपतींनी तेथील सरकार बरखास्त करावे, अशी मागणीही तुपे यांनी यावेळी केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत.