पुणे - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवराय यांनी हिंदू वोट बँक विकसित केलीपासून ते शरद पवार हे राजकारणातील छोटे नेते असल्याचे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. त्यांची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्य खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी . .
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस ! -राजकीय पक्षांकडून उमेदवारांना निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू वोट बँकेपर्यंत नेला. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.
मूठभर शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे कायदे ठरत नसतात -कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मूठभर शेतकऱ्यांमुळे कायदे ठरत नसतात' असं म्हणत शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली होती.