महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मलब्याखाली दबल्यानं मी ओरडलो वाचवा... वाचवा..., पण...;  मजुरानं सांगितला थरारक अनुभव

पुण्यातील कोंढव्यात संरक्षक भींत कोसळून १५ बिहारी मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेत बिमल शर्मा या मजुराला वाचवण्यात यश आले आहे. त्याने या घटनेतील थरारक अनुभव कथन केला आहे.

बिमल शर्मा

By

Published : Jun 29, 2019, 10:55 AM IST

पुणे- रात्री दीडच्या सुमारास मोठ्ठा आवाज झाल्यानं काळजात धस्स झालं. . . . काही कळायच्या आत शेजारच्या भींतीचा मलबा अंगावर कोसळला. . . भींतीच्या मलब्याखाली दबल्यानं मी ओरडलो. . . वाचवा वाचवा . . ., पण कोणीच धावलं नाही. . .आजूबाजुला फक्त किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होता. . .हळू हळू माझा गळा सुकत गेला. . . मी बेशुद्ध पडलो, पण दैव बलवत्तर म्हणून वाचलो. . मात्र माझ्या दोन्ही भावांचा या घटनेत मृत्यू झाला. . हा अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव आहे, कोंढव्यातील भींत कोसळलेल्या घटनेतील वाचवण्यात आलेल्या बिमल शर्मा या मजुराचा.

बिमल शर्मा

घटना कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भींत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. हे सगळे मजूर बिहारमधील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भींत कोसळली. भींत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भींतीचा मलबा पडला आहे. यावेळी मजूर झोपेत असल्याने भींतीच्या मलब्याखाली दबले.


या घटनेत बिमल शर्मा या मजुराला वाचवण्यात यश आले आहे. मात्र त्याच्या दोन्ही भावांचा या घटनेत मृत्यू झाला. या पत्र्याच्या खोल्यांमध्ये १६ ते १७ जण राहत होते, अशी माहिती बिमल शर्माने दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून श्वान मृतदेहांचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेनंतर महापौर मुक्ता टिळक यांनी बांधकामावर बंदी घातली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details