पुणे - उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आवश्यक क्लार्कची भरती करा, बँक ग्राहक व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सक्षम करा, सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करा, पदोन्नती द्या, सर्व शाखा व एटीएमसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारा, कोरोना काळातील प्रशासकीय मनमानी बदल्यांचे धोरण बंद करा, अशा विविध मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आणि महाबँक नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात आले.
शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयासमोर लोकमंगलच्या आवारात बुधवारी हे आंदोलन झाले. फेडरेशनचे धनंजय कुलकर्णी, शैलेश टिळेकर, महासंघाचे रवींद्र जोशी, कर्मचारी सेनेचे अनंत सावंत, नवनिर्माण सेनेचे मनोहन राजापाटील आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर मोठा ताण -
एकीकडे बँकेची उलाढाल, नफा वाढत आहेत. बँकिंग क्षेत्रात महाबँकेचे नाव उत्कृष्ट बँक म्हणून घेतले जाते. बँकेच्या या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा आहे. खासगीकरण, कोरोनाची परिस्थिती यामुळे सर्वत्र अनिश्चितता असतानाही कर्मचारी चांगले काम करत आहेत. बँकेची उलाढाल, नव्या शाखा, नव्या योजना, सेवा बँकेने आणल्या, मात्र लिपिक कर्मचाऱ्यांची भरती केली नाही. कर्मचाऱ्यांचे मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या जागाही भरल्या गेल्या नाहीत. परिणामी, ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. इच्छा असूनही, चांगली सेवा देण्यात कर्मचाऱ्यांवर मर्यादा येतात. त्यामुळे कर्मचारी भरती लवकरात लवकर होणे, मनमानी बदल्या थांबवणे, हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करणे, बँक शाखा व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे आहे.असं यावेळी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं.