पुणे - सैन्य दलात होणाऱ्या शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या सात जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 28 फेब्रुवारीला पुण्यात होणाऱ्या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आरोपी ही प्रश्नपत्रिका विकणार होते. त्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी पुण्यातील वानवडी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण भारतात होणारी परीक्षा सैन्यदलाने रद्द केली आहे.
सैन्यदलात होणाऱ्या शिपाई भरती परीक्षेचा पेपर फुटला, सात जण अटकेत वानवडी येथील गुन्ह्यात किशोर महादेव गिरी (वय 40) माधव शेषराव गीते (वय 38), गोपाळ युवराज कोळी (वय 31) आणि आणि उदय दत्तू आवटी (वय 23) या चौघांना अटक केली आहे. यातील कोळी आणि आवटी हे सैन्य दलातील कर्मचारी आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अली अख्तरखान (वय 47), आझाद लालमोहम्मद खान (वय 37) आणि महिंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37) या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 28 फेब्रुवारीला पुण्यासह भारतभरातील 40 परीक्षा केंद्रावर रिलेशन आर्मी शिपाई भरती ची परीक्षा होणार होती. या परीक्षेला देशभरातून तीस हजार विद्यार्थी बसले होते. दरम्यान या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून काही व्यक्ती ही प्रश्नपत्रिका सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरपूर किमतीने विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पुणे पोलिसांना दिली होती.
त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. यातील आरोपी माधव गीत्ते याने फोडलेली प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षार्थींना देण्यासाठी 14 परीक्षार्थींना विश्रांतवाडीतील एका हॉटेलमध्ये एकत्र केले होते. या प्रकरणातील सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.