पुणे - फळांचा राजा असलेला आंबा हा सर्वांच्या आवडीचे फळ, त्यामुळे दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच असते. परंतु ही उत्सुकता आता संपली असून पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कोकणातील हापूस आंबा दाखल झाला आहे.
हापूस आंबा पुण्याच्या मार्केटयार्डात दाखल हेही वाचा -रिप्ड जीन्स विधानावर नव्या नवेलीची प्रतिक्रिया, म्हणाली...'आधी मानसिकता बदला'
हापूस पुणे मार्केटमध्ये दाखल -
पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये रावसाहेब कुंजीर हे आंब्याचे व्यापारी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची विक्री करतात. यावर्षी मार्केटयार्डमध्ये आंब्याची पहिली पेटी जानेवारी महिन्यामध्ये आली होती. पंचवीस हजार रुपये इतका तिचा भाव होता. त्यानंतर मार्केटयार्डमध्ये हळूहळू आंब्याची आवक होत गेली आणि किमतीतही घट झाली. सद्यस्थितीत चार ते सहा डझनच्या कच्चया आंब्याच्या पेटीसाठी तीन ते चार हजार रुपये इतका दर सुरू आहे. आंबा पिकल्यानंतर हे भाव आणखी वाढतात.
सध्या आंब्याच्या खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत नाही. याला कारणेही अनेक आहेत. त्यामध्ये किमती जास्त असणे हे प्रमुख कारण आहे. तर सध्या कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे अनेक नागरिक मार्केटयार्डमध्ये येण्याचे टाळतात. त्यामुळे दरवर्षी ज्या प्रमाणात विक्री होते यावर्षी ती होताना दिसत नाही.
याविषयी अधिक माहिती देताना रावसाहेब कुंजीर म्हणाले, सध्या मार्केटयार्डमध्ये हापुस आंब्याच्या तयार पेटीला आठ ते दहा हजार रुपये इतका दर सुरू आहे. इथून पुढे हापूस आंब्याची आवक वाढतच जाणार. 15 जून पर्यंत हापूस आंब्याचा हंगाम सुरूच असतो. एप्रिल आणि मे महिन्यात साधारण दहा हजार पेट्या हापूस आंब्याची आवक होण्याची शक्यता आहे. या आंब्याच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांच्या किमतीनुसार दर मिळत असतो.
हेही वाचा -राजस्थानातील शापित गावाची अजब गोष्ट!
ओरिजनल हापूस आंबा कसा ओळखावा?
दर वर्षी बाजारात कर्नाटकचा आणि कोकणातला असे दोन प्रकारचे हापूस आंबे उपलब्ध असतात. त्यातील कोकणातला हापूस आंबा हा ओरिजनल आंबा म्हणून ओळखला जातो. परंतु हे दोन्ही आंबे दिसण्यासाठी सारखेच असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोकणातील आंब्याला समुद्रकिनारा आणि तेथील हवामानामुळे त्याला केसरी रंग येतो. तर कर्नाटकचा आंबा हा थोडा पिवळसर रंगाचा असतो. याशिवाय कर्नाटकचा आंबा कापल्यानंतर पिवळसर रंगाचा तर हापूस आंबा केशरी रंगाचा असतो.