पुणे -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात ( Mosque Loudspeaker Controversy ) घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण चांगलाच तापलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar Criticized Raj Thackeray ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करत राज ठाकरे यांनी जी-जी आंदोलने केली, ती आंदोलने ही राज्याच्या नुकसानीची होती, असा टोला लगावला आहे. पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व सन २०२२-२३ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
'मनसेने जी आंदोलने केली ती फेल झाली' -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागे सांगितलं होतं की, टोल बंद करणार आणि पुणे-मुंबई टोलवर गर्दी केली. पुढे काहीही झालं नाही. या व्यक्तीने जे-जे आंदोलने आत्तापर्यंत केली, ती आंदोलने राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. जर टोल बंद झाले असते, तर राष्ट्रीय महामार्ग झाले नसते. यानंतर परप्रांतीयांसाठी जे आंदोलन केल, त्याचं पुढे काय झालं. त्यानंतर फेरीवाल्यांच्या संदर्भात पण भूमिका घेतली, नंतर त्याच काय झालं. जेवढ्या जेवढ्या भूमिका घेतल्या. त्या सगळ्या फेल झाल्या आहेत. भारत हा सर्वधर्मीय देश आहे. या देशात संविधान, कायदा सर्वांना एकच आहे, असंही यावेळी पवार म्हणाले.
रात्रीच्या वेळी होणाऱ्या सभेला पंचायत होणार -भोंग्यांच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर मशिदीवरील भोंगे नाही, तर मंदिरावरील भोंगेदेखील बंद झाले. ग्रामीण भागात तर काकड आरतीदेखील भोंग्यांवर बंद झाली. याचा परिणाम ग्रामीण भागावरदेखील झाला आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे, त्यानुसार पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. डेसीबलबाबत निर्णय घेतला, तर येणाऱ्या काळात रात्रीच्या वेळी होणाऱ्या सभेला पंचायत होणार आहे, असं देखील पवार यावेळी म्हणाले.