पुणे -पुण्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच बलात्काराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. एका सहा वर्षीय चिमुरडीचे रिक्षाचालकाने झोपेत असतानाच अपहरण केले आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मुलीचे अपहरण करण्यात आले आणि पुणे-सातारा रस्त्यावरील एका इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सागर मारुती मांढरे (वय 39) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही रेल्वे स्थानक परिसरातील फुटपाथवर आपल्या आई वडिलांसह राहते. बुधवारी रात्री ती गाढ झोपेत असताना आरोपीने रिक्षात घालून तिचे अपहरण केले. त्यानंतर पुणे सातारा रस्त्यावरील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान सकाळी उठल्यानंतर कुटुंबीयांना पीडित मुलगी न दिसल्याने त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. परंतु मुलगी सापडली नसल्यामुळे त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा सातारा रस्त्यावरील एका इमारतीत ती पोलिसांना सापडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच आरोपीचा शोध घेऊनही त्याला अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.