मुंबई - राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असून आज सहा जण बाधित आढळून आले आहेत. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका पाच वर्षांच्या मुलाचा त्यात समावेश आहे, मात्र त्याच्यात कोणतेही लक्षणे आढळून आली नाहीत, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर, कोरोनाचे देखील 902 रुग्ण सापडले असून, त्यातील 9 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
राज्यावर ओमायक्रॉनचे संकट घोंघावत असून राष्ट्रीय विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत 54 रुग्ण सापडले असून आज दिवसभरात 6 नवीन रुग्णांचा यात समावेश आहे. मुंबईतील 4, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. मुंबई विमानतळावर सापडलेल्या चार रुग्णांपैकी 1 मुंबई, 2 कर्नाटक आणि 1 औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. दोघांनी टांझानिया आणि दोघांनी इंग्लंडमधून भारतात प्रवास केला आहे. दोन महिला व 2 दोन पुरुष या चौघांचेही लसीकरण पूर्ण झाले असून ते लक्षणेविरहित आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांना विलगीकरण कक्षात ठेवल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
निकटवर्तीय बाधित
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे एका पाच वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाच्या संपर्कात आल्याने तो बाधित झाला आहे. मात्र, सध्या त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. तर, पिंपरी - चिंचवडमधील एक 46 वर्षीय रुग्ण असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
येथे सापडले ओमायक्रॉनचेरुग्ण
मुंबईत 22, पिंपरी - चिंचवड 11, पुणे ग्रामीण 7, पुणे मनपा 3, सातारा 3, कल्याण डोंबिवली 2, उस्मानाबाद 2, नागपूर, लातूर, वसई - विरार, बुलडाणा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे, आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या 54 झाली आहे. यापैकी 28 जणांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.