महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाची आवश्यकता - प्रतापसिंह राणे - पणजी

गोव्यात पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर गोवा स्वच्छ ठेवला पाहिजे. सरकारने स्वच्छता राखण्यासाठी कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. तसेच हाँगकाँगच्या धर्तीवर कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक प्रकल्प उभारावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे

By

Published : Jul 2, 2019, 7:49 PM IST

पणजी - गोव्यात निसर्गत: उपलब्ध असलेले सौंदर्य पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. आपण काही नवे निर्माण केलेले नाही. त्यामुळे स्वच्छता राखणे गरजेचे असून सरकारने यादृष्टीने पावले उचलली पाहिजे. तसेच हाँगकाँगच्या धर्तीवर कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक प्रकल्प उभारावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राणे उपस्थित होते. ते मागील ४८ वर्षे गोवा विधानसभेत पर्ये विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

यावेळी बोलताना राणे म्हणाले, गोव्यात नवा मध्यमवर्ग मोठ्या संख्येने निर्माण होत आहे. ही चांगली बाब आहे. तसेच कचरा आणि प्लास्टिक ही मोठी समस्या दिवसेंदिवस बनत आहे. त्यामुळे यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. हाँगकाँमध्ये कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या कचरा पेट्या ठिकठिकाणी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये जमा झालेला कचरा ठराविक वेळेत जाळला जातो. तसेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाईल अशी यंत्रणा तेथे उभारण्यात आली आहे. याच धर्तीवर उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात एक असा कचरा प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.

गोव्यात पाऊस चांगला पडतो. त्यामुळे काही गोष्टी पाण्यात विरघळून जातात, असे सांगून राणे म्हणाले, की पर्यटन हा मोठा उद्योग आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर गोवा स्वच्छ ठेवला पाहिजे. ज्यामुळे रोगराई दूर होईल. सरकारने स्वच्छता राखण्यासाठी कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. अशा प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने विदेशात शिष्टमंडळ पाठवले पाहिजे. ज्यामुळे कचरा प्रकल्प कशा पद्धतीने कार्यरत आहेत हे समजेल.

दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून ही जबाबदारी आपण स्वीकारण्यास तयार आहात का? असे विचारले असता राणे यांनी मला पक्षाध्यक्षही व्हायला आवडेल. पण मी गोव्यातील एक छोटासा कार्यकर्ता आहे, असे सांगून यावर थेट भाष्य करण्याचे टाळले. यावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार विल्फ्रेड डिसा आणि फ्रान्सिस सिल्वेरा उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details