पणजी- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यावर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. यावेळी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तर महोत्सवात ऑस्कर वितरण पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, दिग्दर्शक मधुर भांडारकर उपस्थित होते.
पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात सुवर्णमहोत्सवी इफ्फी आयोजित केला जाणार आहे. यासाठी रशियाने आंतरराष्ट्रीय भागिदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच देशातील काही राज्ये सहभागी होणार आहेत. याकरिता देशातील 7 शहरांमध्ये रोडशो करत अधिकाधिक चित्रपट रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये सुभाष देसाई, करण जोहर, सुभाष घई, सिद्धार्थ रॉय कपूर, राहुल रवैया, मधूर भांडारकर आदींचा समावेश आहे. सरकारने यासाठी तयारी केली आहे. मागील प्रतिसाद विचारात घेत अधिकाधिक चित्रपट रसिकांना चित्रपटांचा आस्वाद घेता यावा यासाठी काही खाजगी चित्रपटगृहात प्रदर्शन केले जाणार आहेत.