पणजी - राजधानी पणजीत आपले राजकीय वर्चस्व राखण्यासाठी भाजपा, काँग्रेस सह आम आदमी पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते भाजपातील बाबूंश मोन्सेरात (Babush Monserrate) विरुद्ध उत्पल पर्रीकर यांच्या अंतर्गत राजकीय लढतीकडे.
पणजीतून पर्रिकरांचा राजकीय प्रवास सुरु -
1994 साली खऱ्या अर्थाने विधानसभेची वाट धरणाऱ्या मनोहर पर्रीकर यांची सुरुवात याच मतदारसंघातून झाली. पुढे ते विरोधी पक्षनेते व राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2014 ला केंद्रीय संरक्षण मंत्री झाल्यावर त्यांनी ही जागा आपले निकटवर्तीय सिद्धार्थ कुंकळीकर यांना सोडली. पुन्हा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ पुन्हा याच मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परतल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत पर्रीकर यांचा पुन्हा विजय झाला.
25 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला पडला -
2017 ला पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री झालेत, झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार गिरिश चोदणकार यांचा दणदणीत पराभव केला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही पर्रीकर यांना कर्करोगाने ग्रासले आणि 2019 ला त्यांची प्राणज्योत मावळली. पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने सिद्धार्थ कुंकलीकर यांना तिकीट दिले तर काँग्रेस ने पर्रिकरांचे राजकीय विरोधक बाबुश मोन्सेरात यांना रणांगणात उतरवले. मोन्सेरात यांनी विजयश्री खेचत आणून 25 वर्षाच्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.