पणजी - मित्रपक्षाने केलेला वार मगोच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मगोचे कार्यकर्ते लोकसभा प्रचारासाठी आजपासून उघडपणे काँग्रेसचा प्रचार करणार आहेत, असे मगोचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सावंत म्हणाले, सरकारमध्ये मित्र पक्ष म्हणून असताना भाजपने केलेला वार कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण भविष्यात मगो पक्ष विस्तारसाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. हा निर्णय केवळ एका रात्रीत घेतला गेलेला नाही. यासाठी मगोचे छोटे-मोठे नेते कार्यकर्ते, गट समिती आणि हितचिंतक यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा मगो कार्यकर्ते आजपासून उघडपणे प्रचार करणार आहेत.
गोव्यात लोकसभेच्या दोन जागांबरोबरच विधानसभेच्या तीन जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यात आम्ही काँग्रेसला लोकसभेसाठी पाठिंबा देत आहोत. तर विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघात मगो उमेदवार आहे. म्हापसा जागेसाठी मगो गट समितीने यापूर्वी काँग्रेस उमेवाराला पाठिंबा दिला आहे. तर मांद्रे जागेचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असे सावंत यांनी सांगितले.