पणजी- विरोधी पक्षांनी उमेदवार न दिल्याने दक्षिण गोव्यातील काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांची आज उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी याची घोषणा केली.
इजिदोर फर्नांडिस गोव्याचे नवे उपसभापती फर्नांडिस यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सभापतींनी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सावंत मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी मायकल लोबो यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागी कोणाची वर्णी लागते, याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अलिकडे काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये आपला गट विलीन केला. त्यामध्ये फर्नांडिस यांचाही सहभाग आहे. ते ४ वेळा काणकोण मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर फर्नांडिस यांनी सभापतीच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज हाताळताना चांगले आणि शिस्तबद्ध काम केले. त्यामुळे ते या पदाला न्याय देतील, असा विश्वास सभागृहात व्यक्त करण्यात आला.