पणजी- गोव्यात बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रसत्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
तब्बल दोन आठवडे उशिरा दाखल होऊन मान्सून म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही, असे वाटत असतानाच बुधवारी गोव्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. तर काही संरक्षक भिंतीही कोसळल्या.
पणजी अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी पणजीतील इमेक्यूलेट चर्च परिसरात एका उभ्या असलेल्या महागड्या गाडीवर संरक्षक भिंत कोसळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. मात्र, अन्यत्र अशा मोठ्या नुकसानीची घटना घडली नाही. काही ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तर मळा येथे एक झाड घरावर कोसळले. मात्र, यामध्ये मोठे नुकसान झाले नाही.
पहिल्याच पावसात राजधानी पणजीतील अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबर उखडून खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. तसेच रस्त्यावर खडी पसरली होती. पावसाळा सुरू होताना रस्त्यांची अशी दुरावस्था असेल, तर पुढे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.