पणजी -कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच गर्दी होणारी ठिकाणी बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी 22 मार्चला होणाऱ्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे, प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर असले पाहिजे. तसेच हात धुण्यासाठी सुविधा आणि पुरेसे पाणी उपलब्ध असले पाहिजे. या काळात एखाद्या व्यक्तीला आरोग्याची तक्रार जाणवली असेल तर तत्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात भरती करण्यात यावे. निवडणूक कर्मचाऱ्यांनी ठराविक अंतराने हात स्वच्छ धुतले पाहिजे. तर मतमोजणीच्या वेळी प्रत्येक फेरी नंतर हात धुतले पाहिजे. एखाद्या आपत्कालीन स्थितीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून लोकांनाही याविषयी जागृत केले पाहिजे.