पणजी- गोव्यातील स्थानिक टॅक्सी चालकांचा अॅपमधून सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात पुन्हा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे या खासगी अॅप्सना गोवा पर्यटन महामंडळाची मान्यता आहे. मात्र, व्यवसाय धोक्यात आल्याचे आरोप करत टॅक्सी मालकांनी गोवा माईल्सच्या अनेक चालकांना धमक्या दिल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गावात गोवामाईल्सच्या टॅक्सीवर स्थानिक टॅक्सीमालकांनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
गोवामाईल्सचे प्रवक्ते जस्टीन न्यून्स म्हणाले, गोवामाईल्स या एजन्सीला गोवा पर्यटन महामंडळाची मान्यता आहे. तरी काही जणांचे हितसंबंध असल्याने ते टॅक्सीचालकांना अडचणीत आणत आहे. त्यामुळे पर्यटक निराश होत आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल अलेमॅवो यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी चालकांनी रिसॉर्टजवळ निदर्शने केली आहेत. तिथे गोवामाईल्सच्या टॅक्सींवर दगडफेक करण्यात आली. यावेळी टॅक्सी चालकांना वाहनातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले .