पणजी- लॉकडाऊन सुरू असतान घाऊक मद्य गोदाम उघडून दारूची किरकोळ विक्री सुरू होती. या दुकानावर गोवा उत्पादन शुल्क खात्याने छापेमारी करून सील केले आहे. उत्पादन शुल्क खात्याला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
फोंडा येथील एका घाऊक मद्यविक्रेता गोदाम उघडून दारूची किरकोळ विक्री करताना आढळून आला. अधिक चौकशी केल्यानंतर एका विक्रेत्याने लॉकडाऊनच्या वाढीव काळात विक्रीसाठी मालाची साठवण केली होती.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्व दारू जप्त करण्यात आली तर दुकान सील करण्यात आली. तसेच सदर दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला. छाप्यामध्ये 1810 खोके दारू जप्त करण्यात आली. ज्याची किंमत 66 लाखांहून अधिक आहे. खात्याने लॉकडाऊन काळात आतापर्यंत 15 प्रकरणांत 18 हजार 750 लिटर दारू जप्त केली आहे. ज्याची किंमत 77 लाखांहून अधिक आहे.
लॉकडाऊन काळात अशाप्रकारे दारूविक्री करण्याचा प्रयत्न केला तर दक्ष नागरिकांनी उत्पादन शुल्क खात्याच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्पादन शुल्कचे आयुक्त अमित सतिजा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.