पणजी -गुरुवारी गोवा विधानसभेचे ( Goa Election 2022 ) निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, राज्यात काँग्रेस किंवा भाजपालाच पूर्ण बहुमत प्राप्त होणार नाही. हे सध्याच्या एक्झिट पोल वरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ( Maharashtrawadi Gomantak Party ) सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे आखले आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आता सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. जर, राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर भाजप किंवा काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी घेतली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दोन्ही पक्षांना दिला आहे.
ढवळीकरांची चिदंबरम यांनी घेतली भेट
मगो पक्षाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी सुदिन ढवळीकरांची भेट ( Sudin Dhavalikar And P Chidambaram Meeting ) घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सुमारे तासभर चर्चा झाली असून, आगामी सत्ता स्थापनेच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.