पणजी (गोवा) - भाजपचे आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी (दि. 10 जानेवारी) आपल्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेत सुपूर्त केला. पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे लोबो यांनी ( BJP Minister Michael Lobo has Resigned ) सांगितले. ऐन निवडणुकीच्या ( Goa Election 2022 ) तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने याचा फटका भाजपला बसू शकतो. लोबो हे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे दिला राजीनामा, भाजपला बसू शकतो फटका -बारदेश तालुक्यातील ताकदवान राजकीय नेते कळणगुटचे आमदार व भाजप सरकारमधील मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष, सचिवांकडे सुपूर्द केला. लोबो हे पत्नीला शिवोलीम विधानसभा मतदारसंघातून ( Siolim Assembly Constituency ) तिकीट मिळावे यासाठी ते आग्रही होते. मात्र, पक्षाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. तसेच पक्ष आपले काहीही ऐकत नाही म्हणून आपण 15 वर्षाच्या भाजपातील राजकीय प्रवासानंतर आपण भाजप आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे लोबो यांनी सांगितले. दरम्यान, लोबो यांच्या राजीनाम्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोबो हे बारदेश तालुक्यातील आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रबळ नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा भाजपला बारदेश तालुक्यातील 2 ते 3 जागांवर फटका बसू शकतो.