गोवा- राज्याचे उच्च माध्यमिक मंडळाचे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. परीक्षेत एकूण ८९.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दिली. गेल्यावर्षी ८५.८४ टक्यांपेक्षा यावर्षी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. ९१.९७ टक्यांसह मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
गोवा उच्च माध्यमिक मंडळाकडून २० फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १६ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १५ हजार १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७ हजार ९८५ मुलांनी परीक्षा दिली होती. यापैकी, ६ हजार ९४० मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.९१ टक्के असे आहे. तर, ८ हजार ९६७ परीक्षा दिलेल्या मुलींपैकी ८ हजार २४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा सरस ९१.९७ टक्के असे आहे.