पणजी- आम आदमी पक्षाचा प्रचार हा काँग्रेस उमेदवारांविरोधातच अधिक आहे. ते केवळ काँग्रेसची मते खाण्यासाठी निवडणुकीत आहेत. तसेच आपचे दक्षिण गोवा उमेदवार एल्वीस गोम्स राजकारणात येण्यापूर्वी सरकारी सेवेत असतात ते गोव्याचे तुरूंग निरीक्षक होते. मात्र, जे तुरुंग सुधारू शकले नाहीत, ते गोव्याची काय सुधारणा करणार? असा सवाल गोवा काँग्रेसने आज उपस्थित केला. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी हा आरोप केला आहे.
कवठणकर म्हणाले, की आम आदमी पक्ष ही भाजपची बी टीम आहे, हे त्यांच्या प्रचारावरून दिसून येते. ते केवळ काँग्रेस उमेदवारांवर टीका करुन भाजप उमेदवारांना पोषक वातावरण तयार करत आहेत. त्यांच्यावर नाममात्र टीका करतात. तसेच आपचे दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार एल्वीस गोम्स हे सरकारी सेवेत असताना तुरुंग निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तेव्हा तुरुंगात दारू, अमलीपदार्थ, सुरी तुरुंगात पोहचले होते. जे छोटासा तुरुंग सुधारू शकले नाहीत ते गोव्याचा काय विकास करणार, असा सवाल केला. तर गोम्स यांच्याकडे सदर खाते असताना राज्याचे गृहमंत्री कोण होते असा प्रश्न विचारल्यावर कवठणकर यांनी त्याचे उत्तर देण्यास नकार दिला.