महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी - गोवा काँग्रेस न्यूज

22 मार्चला गोव्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Congress Press Conference
काँग्रेस पत्रकार परिषद

By

Published : Feb 27, 2020, 10:59 AM IST

पणजी - लोकांनी नाकारलेले असतानाही सत्तेवर बसलेल्या भाजप सरकार विरोधात गोव्यातील जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस स्वबळावर लढवणार जिल्हा निवडणूक

काँग्रेस पक्ष कार्यकारिणी आणि आमदारांची मंगळवारी याबाबत बैठक झाली. त्यामध्ये सर्व परिस्थितीचा आणि लोकमानसाचा विचार करून काँग्रेसने पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरवले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या चाळीस जागा काँग्रेस लढवणार आहे. जेथे भाजपला स्वबळावर पराभूत करू शकत नाही, त्या ठिकाणी भाजप विरोधी उमेदवारांना काँग्रेस पाठिंबा देणार आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

हेही वाचा -'भाजपचा सावरकर पुळका खोटा, राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर'

काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष सरकारविरोधात एकत्रितपणे आवाज उठवत आहेत. त्यामुळे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्र गोमंतक आणि अपक्ष आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा पंचायत समिती मतदारसंघात उमेदवार उभे करणार का? असे विचारले असता चोडणकर म्हणाले, काँग्रेस सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे.

विरोधकांना मतदार याद्या अनुपलब्ध -

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आजपासून(गुरुवार) अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, भाजप व्यतिरिक्त कोणत्याही विरोधी पक्षांना अजूनही मतदारयाद्या मिळालेल्या नाहीत. राज्य निवडणूक आयोगाला विचारले असता, अजून दोन दिवसांनी याद्या उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. जोपर्यंत मतदारयाद्या मिळत नाहीत, तोपर्यंत उमेदवार निवडणे कठीण आहे. विरोधकांना संधी मिळू नये म्हणून हे भाजप सरकारचे कारस्थान आहे. सरकारने काहीही केले तरी दोन्ही जिल्हा पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा आशावाद चोडणकर यांनी व्यक्त केला.

बिहारमधील भाजप आमदारांचे अभिनंदन -

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहार विधानसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआर यांना विरोध करणारा ठराव मंजूर करून घेतला. यामध्ये 54 भाजप आमदारांचा समावेश आहे. प्रदेश काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी या भाजप आमदारांचे अभिनंदन केले. सरकारविरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जात आहे. अशावेळी नितीशकुमार सरकारने सरकारच्या मताविरुद्ध ठराव मंजूर केल्यामुळे भाजप सरकार त्यांना आता पाकिस्तानमध्ये पाठवणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, उत्तर गोव्यातील हळदोणा जिल्हा पंचायत सदस्य गोकुळदास हळर्णकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत चोडणकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत पोंबुर्फा ग्रामपंचायत सदस्य रुबी हळर्णकर आणि अन्य कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ABOUT THE AUTHOR

...view details