पणजी- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते फडणवीस यांची गोवा राज्याच्या निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर फडणवीस सोमवारी गोव्यात दाखल होऊन त्यांनी दिवसभरात राज्यातील मंत्री, नेते व विविध पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या, दरम्यान सोमवारच्या विविध चर्चात फडणवीसांना राज्यातील अनेक नेते नाराज असल्याचे दिसून आले. तर काही नेते त्यांच्यासमोरच टोकाची भूमिका घेऊन हातघाईस आल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेची मोट बांधण्यासाठी आधी घरातल्या(भाजपा) नाराज आमदारांना एकत्र आणण्यासाठी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.
फडणवीसांनी घेतल्या नाराज आमदारांच्या गाठीभेटी गडकरीच्या नंतर सत्ता टिकविण्याचे फडणवीसांचेही ध्येय- आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत यांच्या बरोबरीने काम करून भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने निवडणूक प्रभारी या नात्याने फडणवीस यांच्यावर सोपविली आहे. २०१७ साली नितीन गडकरी यांनी संकटमोचक होऊन घटक पक्षांची मोट बांधून मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी गडकरी यांनी मोलाची भूमिका निभावून ऐनवेळी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असतानाही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांना एकत्र आणून राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आणले होते. मात्र २०१९ नंतर घटक पक्षाना बाजूला करून काँग्रेस आणि मगोपचे आमदार फोडून त्यांना भाजपात प्रवेश देऊन भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले होते. मात्र याच आमदाराच्या व जुन्या नेत्यांच्या अंतर्गत वादाला शमविण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे.
फडणवीसांनी घेतल्या नाराज आमदारांच्या गाठीभेटी काय आहेत नेत्यांचे वाद आणि कोणा-कोणाची घेतली फडणवीसांनी भेट-मायकल लोबो- कॅलनगुटचे आमदार आणि विद्यमान मंत्री मागच्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यातील डिजिटल मीटर वरून त्यांनी वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांना टार्गेट केले होते. त्यामुळे लोबो विरुद्ध म्हाव्हीन असा वाद उफाळून आला होता. तसेच लोबो याना आपल्या पत्नीलाही शिवोली मतदारसंघातून निवडणुकीत उतरवायचे आहे, त्यामुळे त्यांनी मागच्या काही दिवसांपासून या मतदारसंघात आपला हस्तक्षेपही वाढविला होता. त्यामुळे याची तक्रार येथील आमदार दयानंद मांद्रेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे लोबो यांची फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली.
फडणवीसांनी घेतल्या नाराज आमदारांच्या गाठीभेटी; काँग्रेसमध्येही केली चाचपणी बाबू कवळेकर- काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवलेकर यांना आपल्या पत्नीला सांगे मतदारसंघातून निवडणुकीत उतरवायचे आहे, मात्र त्याला मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे, त्यामुळे नाराज असणाऱ्या कवलेकरांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस यांनी त्यांच्या घरीच जाणे पसंत केले, आणि सोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रमही केला.
विश्वजीत राणे-
कोविड काळात आरोग्य यंत्रणेवरून उदभवलेल्या वादावरून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात बरेच मतभेद निर्माण झाले होते. त्यातच राणे वैयक्तिक रित्या दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेत, त्यामुळे सावंत राणे वाद निर्माण झाला होता, मात्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री विश्वजीत राणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व सोबत स्नेहभोजन ही केले.
श्रीपाद नाईक-
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक राज्याच्या राजकारणात येण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद ही जाऊ शकते अशी मध्यंतरी चर्चा ही सुरू झाली होती. मात्र नाईकांना दिल्लीतच ठेवून राज्य प्रमोद सावंतांकडे देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. त्यातच नाईक यांना आपला मुलगा सिद्धेश याला कुंभारजुवेतुन निवडणुकीत उतरवायचे आहे, मात्र त्याला येथील आमदार पांडुरंग मंडकयकर यांचा विरोध आहे, याच गोष्टींमुळे श्रीपाद नाईक नाराज होते, मात्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली.
काँग्रेस नेत्यांचीही फडणवीस यांनी घेतली भेट-
आपल्या लोकांसाहित विरोधकांनाही आपल्यासोबत सत्तेसाठी गोंजारणे हा फडणवीसांचा स्वभाव. म्हणूनच त्यांनी भविष्यातील अंदाज घेऊन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, त्यामुळेच पिता पुत्रांना एकत्र आणण्याचा कयास फडणवीस यांचाही असेल. दरम्यान फडणवीस यांच्या राणे भेटीने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. कॉंग्रेसवासी असणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी २०१७ साली असाच धक्का देऊन भाजपात प्रवेश केला होता, व पुढे ते पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले.
तरीही आमदार म्हणतात माझाच नंबर-
मांद्रे मतदारसंघात २०१७ ला तत्कालीन काँग्रेस उमेदवार दयानंद सोपटे यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव केला होता, पुढे २०१९ ला सोपटे भाजपवासी झाले, म्हणून फडणवीस भेटीत सोपटे आणि पार्सेकर यांनी या मतदारसंघावर आपला दावा केला. तरी पण सोपटे यांनी विजयासह आपणच येथील भविष्यातील भावी आमदार असल्याचे सांगितलं.
हेही वाचा - अनिल परबांचा किरीट सोमैयांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
हेही वाचा - महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी-अखिलेश यादव