पणजी -गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशन 16 एप्रिलपर्यंत चालणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज पहिल्याच दिवशी विधानसभेत दुपारच्या सत्राच्या सुरुवातीला अर्थसंकल्प मांडणार आहेत. वर्षभरात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने सर्वच घटकांना याची उत्सुकता आहे.
वर्ष 2020 च्या सुरुवातीलाच जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे टाळेबंदी करण्यात आली. ज्यामुळे मार्च ते नोव्हेंबर 2020 पर्यंत बहुतांश उद्योग-व्यवसाय बंद राहिले. तर गोव्याचा अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारा खाण उद्योग मागील 3 वर्षांपासून बंद आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ही कोलमडला. या सर्वस्थितीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री डॉ. सावंत कशाप्रकारचा अर्थसंकल्प सादर करतात याविषयी जनतेमध्ये उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'ची घोषणा केली. त्याच धर्तीवर आपला अर्थसंकल्प हा 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला बळकटी देणारा असेल, असे डॉ. सावंत यांनी यापूर्वी जाहीर सांगितले आहे.