पणजी - पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पक्षाध्यक्षांच्या नावाने मतदारांना धमकावत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला. तसेच ही राजकारणाची भाषा नव्हे, असे म्हणत काँग्रेसने याचा निषेध केला आहे.
काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, पणजीमधील निवडणूक प्रचारात काँग्रेस आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. तर भाजप विभागलेली दिसत आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नावाने मतदारांना धमकावत आहे.
जे सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक काँग्रेसचा प्रचार करत आहेत, त्यांची बदली करण्याची धमकी गोव्याचे मुख्यमंत्री देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्यादेत राहून प्रचार करावा. तसेच सरकारी अधिकारीही भाजप सत्तेत आहे, म्हणून भाजपला मतदान करावे यासाठी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. हे त्यांनी थांबवावे.