पणजी- दरवर्षीप्रमाणे यंदाही आज गोव्यात सर्वत्र 'सांजाव' मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये अबालवृद्धांनी पाण्यात भीजण्याचा आनंद लूटला. संत जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जातो.
मान्सून सुरु झाल्यानंतर गोव्यातील ख्रिस्ती बांधवाचा हा पहिलाच सण असतो. डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट आणि फुलांच्या माळा, हातात माडाच्या झाडाच्या फांद्या आणि वाद्यांचा गजर करत ख्रिस्ती बांधव या दिवशी गटागटाने फिरतात. यावेळी विहीरी आणि तलावात उड्या मारत ख्रिस्ती बांधवांनी मौजमस्ती केली.
गोव्यात 'सांजाव' उत्सव उत्साहात साजरा या दिवशी सर्वजण एकत्र येत येऊन चर्चमध्ये प्रार्थना करतात. त्यानंतर 'सायबीण'(देवी)ची मूर्ती हातात घेऊन बँडच्या तालात विहीरीकडे जातात. तेथे प्रथम देवीची मूर्ती काठावरून पाण्यात टाकतात. त्यानंतर जमलेले लोकही विहीरीत उड्या मारतात. यामध्ये महिला आणि मुलांचाही सहभाग असतो. तसेच देवीबरोबर पाण्यात फळे आणि मद्याच्या बाटल्या फेकल्या जातात. तसेच काठावर उपस्थितांना फळे वाटण्यात येतात.
याविषयी आमचे प्रतिनिधी क्रांतीराज सम्राट यांनी येथील उपस्थितांशी बातचित केली. यावेळी बोलताना ओलिंडा म्हणाल्या, दरवर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने एकत्रित जमून सांजाव साजरा करतो. यामध्ये विहिरीत उड्या घेणे, पावसात भिजणे, असा हा उत्सव संपूर्ण गोव्यात साजरा होतो.
दरम्यान, पारंपरिक पद्धतीने विहीरी, तलाव अथवा नदीमध्ये उड्या घेत सांजाव साजरा केला जातो. मात्र, अलिकडे काही ठिकाणी कृत्रिम तलाव बनवून याचा सणाचा आनंद लुटला जातो. त्यामुळे लहान मुले आणि महिलांना पाण्यात डुंबण्याचा आनंद घेता येतो.