पणजी -कळंगुट पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज टाकलेल्या छाप्यात सुमारे ३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यासंदर्भात एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
कळंगुट पोलीस निरीक्षक नोलास्को रापोसो यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील कांदोळीमधील एका घरावर छापा टाकला. ज्यामध्ये इफीयान्यी पास्कोल ओबी (Ifeanyi Pascoel Obi ) या 34 वर्षीय नायजेरियन युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सुमारे 1.021 किलोग्रॅम कोकेन, सुमारे 2.035 किलोग्रॅम एमडीएमए, सुमारे 760 ग्रॅम अॅम्फेटामाईन, सुमारे 106 ग्रॅम चरस, सुमारे 1.270 किलोग्रॅम गांजा आणि 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.
गोवा पोलिसांनी अलिकडे अंमली पदार्थ जप्त केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई आहे. राज्यातून अंमली पदार्थांचा बिमोड करण्याचा गोवा पोलिसांनी चंग बांधला आहे. त्यामुळे अंमलीपदार्थ आणि विक्रेत्यांवर त्यांची सातत्याने करडी नजर आहे. याविषयी कळंगुट पोलीस स्थानकात अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम 21 (सी), 22 (सी), 20 (बी), (2) आणि कलम 20 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर गोवा उपविभागीय पोलीस अधिकारी एडविन कुलासो आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.