आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
गोव्यात 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या महोत्सवात विस्मृतीत गेलेल्या टोकियोमधील युद्धग्रस्त भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देणारा जपानी चित्रपट ‘रिंग वॉन्डरींग’, 52 व्या इफ्फीमध्ये ठरला सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पणजी - गोव्याची राजधानी पणजी इथे गेले 9 दिवस चाललेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीची ( 52nd International Film Festival of India )आज रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, या महोत्सवाच्या विविध स्पर्धा विभागाचे ज्युरी आणि भारतीय तसेच परदेशी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.
प्रसून जोशी ठरले भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्वचे मानकरी -
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी ( Prasoon Joshi )यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
एक नजर चित्रपट आणि पुरस्कारावर -
विस्मृतीत गेलेल्या टोकियोमधील युद्धग्रस्त भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देणारा जपानी चित्रपट ‘रिंग वॉन्डरींग’, 52 व्या इफ्फीमध्ये ठरला सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी.
निराशेच्या जीवघेण्या थंडीत आशेचा दीप लावण्याची प्रेरणा देणाऱ्या, झेकोस्लावियाचा दिग्दर्शक व्हॅक्लाव्ह कद्रन्का यांच्या 'सेव्हिंग वन हू इज डेड' चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार.
मराठी चित्रपट ‘गोदावरी’ ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार; निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रौप्य मयूर पुरस्कार तर दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार.
दिग्दर्शक रॉड्रिगो डी ऑलिव्हेराच्या 'द फर्स्ट फॉलन' मधील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा कार्व्हालोला आणि निखिल महाजनच्या 'गोदावरी' चित्रपटाला विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार, संयुक्तरित्या जाहीर.
आपल्या अभिनयाने, सर्व ज्यूरी सदस्यांना खिळवून ठेवणाऱ्या स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना हिला शार्लोटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार
1984 या वर्षीच्या रशियातील गुंतागुंतीच्या घडामोडी आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी रशियन दिग्दर्शक रोमन वास्यानोव्हच्या 'द डॉर्म' ला, स्पेशल मेन्शन म्हणजेच’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त.
दिग्दर्शक मारी अलेसेंद्रिनीचा ‘झाहोरी’ हा धर्म आणि वसाहतवादावर प्रकाश टाकणारा आणि पॅटागोनियाच्या मूळ स्थानिक लोकांना अत्यंत उमदेपणे सन्मान देणाऱ्या चित्रपटाची, 52 व्या इफ्फीमध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
स्पॅनिश चित्रपट 'द वेल्थ ऑफ द वर्ल्ड' द्वारे पदार्पण करणारे दिग्दर्शक सायमन फॅरिओल यांना पदार्पणातील स्पर्धा गटात विशेष उल्लेखनीय चित्रपट सन्मान.