पणजी- शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा गोवा शिवसेनेला अधिक होणार आहे. ज्यामुळे लोकांसमोर जात आमदार निवडून आणणे शक्य होणार आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही इच्छा गोव्यात सत्ता यावी अशीच होती, असे मत शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत गोव्यातही असा प्रयोग झाला पाहिजे, असेच म्हटले होते. त्यावर राऊत यांनी गोव्यात राजकीय भूकंप होईल, असे विधान केले.
त्याविषयी कामत यांना विचारले असता, शिवसेना भाजप युती असल्याने विरोधात निवडणूक लढविताना आमच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता जर खासदार राऊत जर असे म्हणत असतील तर त्यांनी काही राजकीय रणनीती आखली असेल. माझेही त्यांच्याशी याविषयी बोलणे झालेले नाही.
महाराष्ट्राप्रमाणे येथेही काँग्रेससोबत काम करणार का? असे विचारले असता, कामत म्हणाले, तेथे निवडणुकीत नाही तर सरकार घडविण्यासाठी आघाडी करण्यात आली आहे. येथे काँग्रेस आणि आम्ही आमची विरोधकाची भूमिका चांगल्याप्रकारे निभावत आहोत. आम्ही दोघे एकत्र येऊन विरोध केला तर काही चुकीचे होणार नाही. गोव्याचे शिवसेना प्रभारी राऊत असून ते आल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट करतील.