नाशिक - गंगापूर धरणातून नगर जिल्ह्यासाठी आवर्तन सोडल्याने काही तरुणांनी रामकुंडावर पोहण्यासाठी गर्दी केली होती. संचारबंदीचे आदेश झुगारून हे सर्वजण या ठिकाणी फोटोसेशन करत होते. पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी असल्याने शहरातील प्रत्येक चौकात पोलीस तैनात आहेत. मात्र, याठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर आले आहे.
रामकुंडावर लॉकडाऊनची ऐशी-तैशी ; नदीला पाणी सोडल्याने नाशिककरांची पोहायला गर्दी - covid 19 in nashik
गंगापूर धरणातून नगर जिल्ह्यासाठी आवर्तन सोडल्याने काही तरुणांनी रामकुंडावर पोहण्यासाठी गर्दी केली होती. संचारबंदीचे आदेश झुगारून हे सर्वजण या ठिकाणी फोटोसेशन करत होते.
उन्हाळा सुरू झाल्याने सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने रामकुंड, सिताकुंड आणि लक्ष्मणकुंड खळाळून वाहत होते. याठिकाणी नाशिककरांनी फोटोसेशन सुरू केले. तसेच पोहण्यासाठी गोदाघाट परिसरात गर्दी करून लॉकडाऊन धाब्यावर बसवले.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांनी घरात असणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. मात्र, काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे संचारबंदीची पायमल्ली होत आहे. यामुळे शासनाच्या आव्हानांमध्ये वाढ झालीय.