नाशिक - सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवन परिचयाचे ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हाती घेतले होते. मात्र, भारत- चीन युध्दामुळे त्यांना दिल्लीला जावे लागले व हे काम अपूर्ण राहिले. सयाजीराव हे मुळचे मालेगाव. नाशिक या त्यांच्या जन्मभूमीत होत असलेल्या संमेलनात त्यांचे जीवन परिचय करुन देणार्या ग्रंथाचे प्रकाशन होणे ही आनंदाची बाब आहे. पुढील काळात ग्रंथ, नाटक, चित्रपट या माध्यमातून सयाजीराव महाराज यांचे मूल्य, आदर्श जगभरात पोहचावे अशी अपेक्षा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री तथा प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ( Uday Samant nashik marathi sahitya sammelan ) व्यक्त केली आहे.
उदय सामंत यांची सोहळ्यास ऑनलाईन हजेरी -
साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशी शनिवारी (दि. ४) सयाजी गायकवाड महाराज यांचे जीवन परिचय करुन देणार्या ५० ग्रंथांचे प्रकाशन ( Uday Samant Publish Sayajirao Gaikwad life books ) झाले. त्यावेळी ते बोलत होते. तांत्रिक कारणामुळे उपस्थित राहू न शकल्याने उदय सामंत यांनी या सोहळ्यास ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर राजमाता शुभांगिनी गायकवाड, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, प्रकाशन समितीचे सचिव बाबा भांड आदी उपस्थित होते.
'महाराजांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी'
सयाजीराव यांच्या जन्मभूमीत हा प्रकाशन सोहळा होत असल्याचा अभिमान आहे. त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी अस्पृश्य महिलांसाठी पहिली शाळा काढली. अस्पृश विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काढले. महिलांसाठी पहिली व्यायामशाळा बांधली. ज्या हिंदू कोड बीलच्या मुद्यावरुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा द्याव्या लागला होता. त्या बिलच्या मुद्यांची सयाजीराव यांनी स्वातंत्र्यापुर्वीच त्यांच्या राज्यात अंमलबजावणी केली होती. त्यांचे हे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे राजमाता शुभांगिनी गायकवाड त्यांनी सांगितले.