आदिवासी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च पोलिसांनी उधळून लावला
विद्यार्थ्यांचा हा लाँगमार्च नाशिकहून निघालाच नाही, मात्र सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे आदिवासी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
नाशिक - मुंबईच्या दिशेने जाणारा आदिवासी विद्यार्थ्यांचा लाँगमार्च पोलिसांनी उधळून लावला. लॉंगमार्चला परवानगी नाकारत सकाळी ७ वाजल्यापासून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली होती.
पोलिसांनी ५० हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यामुळे अनेक विद्यार्थी भीतीपोटी सहभागीच झाले नाही. हे सरकार आदिवासींच्या सवलती धनगर समाजाला देत आहे, त्यामुळे आदिवासींना सुविधा मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधाही कमी करण्यात आल्या आहेत, असे म्हणत या विरोधात आज विद्यार्थी संघटनेच्यावतीने नाशिक ते मुंबई लाँगमार्चचे आयोजन करण्यात आले होते.
गोल्फ क्लब मैदानापासून विद्यार्थ्यांच्या लाँग मार्चला सुरुवात होणार होती. हा लाँगमार्च मंत्रालयावर धडकणार होता, मात्र सकाळी ७ वाजल्यापासूनच गोल्फ क्लब येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी गोल्फ क्लब मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.