नाशिक -दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने चलो दिल्लीचा नारा दिला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबरला नाशिकहून वाहन मोर्चाद्वारे दिल्लीला रवाना होतील. त्यापुर्वी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल, असा निर्णय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकरी 1266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील.
बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार-
दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याची माहिती किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले-
दिल्ली येथील आंदोलनात दिल्लीच्या आजूबाजूची राज्ये प्रामुख्याने सामील झाली आहेत. 3 डिसेंबरच्या देशव्यापी निदर्शनांमध्ये व 8 डिसेंबरच्या भारत बंद मध्ये देशभरातील इतर राज्यांमधील जनतेने आंदोलनाला प्रचंड पाठिंबा दिला. मात्र दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमधील शेतकरी अद्याप प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊ शकले नव्हते. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकरी दिल्लीला जाऊ शकले नव्हते. मात्र आता हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही दिल्लीच्या दिशेने कूच करतील, असा विश्वास किसान सभा व्यक्त करत आहे.