नाशिक - एका पक्षाचे सरकार असले, तरी थोड्याफार कुरबुरी चालतात. हे तर तीन पक्षांचे एकत्रित सरकार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी 'सामना'मध्ये आज छापलेल्या अग्रलेखावर बोलताना दिली. तसेच, सरकारमध्ये थोड्याफार कुरबुरी असल्या म्हणजे सरकार पडणार आणि आम्हाला संधी मिळणार असे कोणी समजू नये, असा टोला देखील भुजबळ यांनी लगावला आहे.
आपल्याला सरकारच्या निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरच हे गार्हाणे मांडणार असल्याचेही काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज काँग्रेसला चिमटे काढण्यात आले आहे. त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय वादंगाबद्दल छगन भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा...खाट का कुरकुरतेय?, मंत्री चव्हाण अन थोरातांवर सामनातून 'तिरकस बाण'
'एका पक्षाचे सरकार असले, तरी थोड्याफार कुरबुरी चालतात. हे तर तीन पक्षांचे एकत्रित सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येकाला भेटत आहेत. त्यांच्या समस्या जाणुन घेत आहेत. आमचे देखील अनेक मंत्री काम करत आहेत. मात्र, कोरोनामुळे काही अडचणी निश्चित येत आहेत. परंतु, सरकारमधे थोड्या कुरबुरी असल्या म्हणजे सरकार पडणार आणी आम्हाला संधी मिळणार, असे कोणी समजायचे कारण नाही.' असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज काँग्रेसच्या नाराजीबद्दल भाष्य करण्यात आले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी,'सामनाच्या अग्रलेखातून फार कोणावर टीका केलेली आहे, असे मला वाटत नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, थोडीशी कुरबुरी होते. खाट कुरकुरते आहे पण ती मजबूत आहे. हे खरे आहे की, कोरोनामुळे मंत्र्यांचा एकमेकांशी संपर्क थोडा कमी झालेला आहे. पण हे स्वाभाविक आहे. सरकारमधील तीन मंत्री करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जास्त वेळ कॅबिनेटमध्ये येऊ शकत नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे मंत्री संपर्क साधत आहेत. त्यामुळे कदाचित कोणाला असे वाटत असेल की, आपल्याला निर्णयापासून दूर ठेवले गेले की काय. परंतु, मुख्यमंत्री हे सर्व मंत्र्यांना भेटतात. त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांच्या सुचना जाणून घेतात. त्यामुळे या लेखातील टीकेबाबत फार काळजी करण्याचे कारण नाही' असे छगनव भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा...'सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी रुग्णांच्या खाटांचे बघा!'