नाशिक- सोसायटीमध्ये निघालेला विषारी कोब्रा साप पकडण्यासाठी सोसायटी मधील रहिवाश्यांनी पैसे दिले नाही म्हणून एका सर्पमित्राने पकडलेला कोब्रा जातीचा विषारी साप घराच्या दरवाजाला अडकवून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक मध्ये घडला आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका सोसायटीमधील घटना
सर्पमित्राने कोब्रा जातीचा विषारी साप पकडल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर सर्पमित्राने रहिवाशांकडून एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र रहिवाशांनी पैसे न दिल्याने या सर्पमित्राने पकडलेला इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सोसायटी मधील पहिल्या मजल्यावर जाऊन एका फ्लॅटच्या दरवाज्याच्या कडीला लावून तेथून तो फरार झाला.
'त्याने जास्त पैशाची मागणी केली..'
दोन दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये आम्हाला साप दिसला, याबाबत आम्ही इंटरनेटवरून जवळच्या सर्प मित्राशी संपर्क साधून त्याला साप शोधण्यासाठी बोलवलं. मात्र साप हातात लागल्यानंतर त्याने आमच्याकडे एक हजार रुपयाची मागणी केली. आम्ही दोन तीनशे रुपये देऊ असे म्हटले, मात्र त्याला त्याचा राग आला. त्यातूनच त्याने सोसायटीच्या एका फ्लॅटच्या दाराला साप अडकवला आणि तो निघून गेला. असं येथील एका महिलाने सांगितलं आहे.
नागरिकांनी तक्रार करावी
सोसायटी मधील नागरिकांकडून सापाला पकडताना आणि सोडताना व्हिडिओ, छायाचित्र सारखे कोणतेही पुरावे मिळाल्यास संबंधित सर्प मित्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, जेणेकरून अशा घटना यापुढे होणार नाही, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांनी न घाबरता तक्रार द्यावी. तक्रारदाराचे नाव आणि माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असं नाशिक पश्चिम विभागाचे उपसंरक्षण अधिकारी पंकज गर्गे यांनी सांगितले.