नाशिक- एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मागील काही वर्षापासून प्रचंड उकाडा वाढला आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाने चाळीशी गाठली आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने नाशिककरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
नाशिकचे तापमान ४० अंशावर, नागरिकांची शितपेयाकडे धाव.. - District
नाशिकमध्ये मागील काही वर्षापासून प्रचंड उकाडा वाढला आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाने चाळीशी गाठली आहे.
सकाळी १८ अंशावर असलेले तापमान सकाळी ११ वाजता ३५ अंशावर जाऊन पोहोचत आहे. तर १२ पर्यंत पारा ४० अंशावर जात आहे. या तळपत्या उन्हात नागरिक रस्त्यावरुन जाताना उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, उपरणे वापरत आहेत. तर महिलादेखील स्कार्फ आणि सनकोटचा वापर करताना दिसून येत आहे.
शहरातील रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी झाली असून उन्हापासून बचावासाठी नागरिक सावलीचा आश्रय घेत आहेत. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने रस्त्यावरील थंडपेय दुकानांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे लिंबूपाणी, ताक, शहाळे यांची मागणी वाढल्याने लिंबू आणि शहाळे यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. ३० रुपये दराने विकले जाणारे शहाळे ४० रुपयांवर गेले आहेत. तर लिंबांच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.