नाशिक - "विकास" या गोंडस नावाखाली नाशिक महानगरपालिकेच्या मालकीच्या हजारो कोटी रुपयांच्या मिळकती बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या तब्बल २२ मिळकती BOT तत्त्वावर विकसित करण्याचा अशासकीय ठराव करत सत्ताधारी भाजपा हा विषय रेटून नेण्याच्या तयारीत आहे. मात्र पालिकेच्या विरोधी बाकावर असलेल्या सेना-मनसेने या विषयाला कडाडून विरोध केला आहे.
'BOT तत्त्वावर विकास केला तर गैर काय?'
नाशिक महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या सत्ताधारी भाजपाने नाशिक शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या तब्बल 22 मिळकती BOT तत्त्वावर बिल्डरांना विकसित करण्यासाठी देण्याचा अशासकीय ठराव जादा विषयात रेटून नेण्याचा घाट घातला आहे. शहरातील द्वारका, पंचवटी, भद्रकाली मार्केट, कॅनडा कॉर्नर येथील जलधारा वसाहत, बी. डी. भालेकर हायस्कूल, पंचवटी येथील इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर टाऊन हॉल, नाशिकरोड कॉम्प्लेक्स, गोल्फ क्लब पार्किंग अशा मोक्याच्या मिळकतींचा यात समावेश आहे. पालिकेकडे पैसे नसल्याने आपण या मिळकती जर BOT तत्त्वावर विकसित केल्या तर यात गैर काय, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला आहे.