नाशिक -डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याच्या दुर्घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, महापौरांनी या दुर्घटनेबाबत दिलेल्या चौकशी आदेशाचे पुढे काय झाले?, याचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी ऑनलाइन महासभेत ऑफलाइन गोंधळ घातला आहे.
नगरसेवक गायकवाडांचा ऑनलाइन महासभेत ऑफलाइन गोंधळ
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एप्रिल महिन्यात गॅस गळती होऊन जवळपास 21 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले होते. तसेच चौकशी पूर्ण झाल्यावर चौकशी अहवाल महासभेसमोर सादर करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले होते. मात्र महिनाभराचा कालावधी उलटून देखील याबाबत काही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी सोमवारी झालेल्या महासभेत ऑफलाइन पद्धतीने गोंधळ घातल्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना सभागृहाच्या बाहेर थांबवल्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी ठाण मांडून आंदोलन केले आहे.