नाशिक - नाशिकच्या सिन्नर येथील युवा मित्र संस्थेने स्थापन केलेल्या राज्यातील पहिल्या सावित्रीबाई फुले शेळीपालन संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू ( Savitribai Phule Goat Farming nashik Success Story ) आहे. 10 हजार महिला सभासद संख्या असलेली या संस्थेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्याचे कार्य होत आहे. शेळीचे दूध, तूप, चीज, लेंडी खत आदींचा व्यवसाय करत आज संस्था वार्षिक एक करोडची उलाढाल करत आहे.
म्हणून रोवली संस्थेची मुहूर्तमेढ - महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सिन्नर येथे युवा मित्र संस्थने नाबार्ड प्रोड्युस फंड अंतर्गत संस्था 2016 रोजी स्थापन करण्यात आली. दुष्काळ भाग असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेळी पालकांना संघटित करणे. त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे, शेळ्यांचे वजनावर आधारित श्वाश्वत खरेदी विक्री व्यवस्था उभी करणे, शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून महिला व युवकांना श्वाश्वत उपजिविकेची संधी निर्माण करून देणे. शेळी पालन करणाऱ्या महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करणे. तसेच शेतकऱ्यांचे शेळीपालन व्यवसायाचे उत्पादक आणि उत्पन्न वाढवणे व त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे. या दृष्टिकोनातून संस्थेची मुहूर्तमेढ करण्यात आली होती.
संस्थेची वाटचाल -2016 मध्ये सावित्रीबाई फुले शेळी पालन संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला 100 महिला या संस्थेला जोडल्या गेल्या होत्या. आज कंपनी 100 गावामध्ये काम करत असून त्यात महिला सभासदांची संख्या 10 हजार वर जाऊन पोहचली आहे. सुरुवातीला महिलांना योग्य मोबदला मिळावा म्हणून शेळ्यांची खरेदी- विक्री भर देण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती याबाबत माहिती व्हावी म्हणून केंद्र सुरू करण्यात आले. या माध्यमातून महिलांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शेळ्यांच्या चारा आणि शेळ्यांच्या लेंड्यापासून गांडूळ खत निर्मीती करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यातून महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. संस्था एवढावरच न थांबता 2019 पासून शेळी दूध व्यवसाय सुरू करण्यात आला. याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. यातूनच पुढे जाऊन दुधापासून चीज निर्मिती करण्यात आली. याला देखील बाजारात मोठी मागणी दिसून आली.