महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रयतेची काळजी म्हणून शिवजयंतीवर निर्बंध - संजय राऊत - sanjay raut marathi news

दरवर्षी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या सावटामुळे राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर अनेक निर्बंध घातले.

By

Published : Feb 14, 2021, 4:16 PM IST

नाशिक - दरवर्षी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या सावटामुळे राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर अनेक निर्बंध घातले. यावर विरोधकांनी सडकून टीका केली. दरम्यान नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. रयतेची काळजी म्हणून सरकारने शिवजयंतीवर निर्बंध घातल्याचे राऊत म्हणाले.

छत्रपती जरी सत्तेवर असते तरी त्यांनी हे निर्बंध घातले असते. रयतेची काळजी म्हणून सरकारने निर्बंध घातले आहेत. मुंबई-नाशिकमध्ये कोरोनाचा आकडा वाढतो आहे. निर्बंध शिथिल केल्याचा हा परिणाम आहे. पण शिवजयंतीला मिरवणुका निघतील असे सांगत संजय राऊत यांनी शासनाच्या भुमिकेचे समर्थन केले.

शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का - विखे पाटील

शिवजयंतीला नियमावली तयार करुन महाविकास आघाडी सरकारने महाराष्‍ट्राच्‍या अस्मि‍तेला धक्‍का पोहचविला आहे. मंत्र्यांच्‍याच मि‍रवणुका राज्‍यात बिनधास्‍तपणे सुरू आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मिरवणुकांना मात्र नियमावलीत अडकविले जातंय. महाविकास आघाडी सरकारने हा विषय प्रतिष्‍ठेचा न करता ही नियमावली तातडीने मागे घेण्याची मागणी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक -

मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन शिवजयंती संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितल की, आज वंदनीय बाळासाहेब असते तर त्यांना ही उध्दव ठाकरे हे आपले पुत्र असल्याची शरम वाटली असती. शिवगर्जना देऊन शिवसेनेची स्थापन केली होती खरी मात्र मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी चक्क शिवजयंतीवरच निर्बंध लादले आहेत, अशा सरकारचा मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला थेट सवाल विचारला आहे की, पक्षाच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी ही शासनाला मान्य आहे आणि शिवजयंतीला फक्त 100 व्यक्ती हजर राहू शकतात हा कुठला न्याय आहे, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केला आहे.

मनसेचा सरकारला इशारा -

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बारची वेळसारखी वाढवून देणारे आणि विविध निवडणुकीत आणि पक्षाच्या कार्यक्रमात कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंतीला नियमावली असा प्रश्न नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका, असा इशारा नांदगावकर यांनी राज्य सरकारला आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिला आहे.

शेलारांचा उपरोधिक टोला-

आशिष शेलार यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी 'भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर, असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे,' असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

शिवजयंती साधेपणाने साजरी करा; राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन

येत्या शुक्रवारी १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीवर राज्य गृह विभागाने निर्बंध घातले होते. तशा संबंधीच्या मार्गदर्शक सूचना गुरुवारी जारी केल्या. गर्दी टाळणे, मास्क लावणे, रॅली न काढण्याबरोबरच केवळ १० व्यक्तीमध्ये शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना केल्या होत्या. शिवजयंती साजरी करणाऱ्यांच्या आनंदावर यामुळे विरजण पडल्याने सरकारला टीकेचे लक्ष्य बनावे लागले. त्यानंतर सरकारने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिल्याचे म्हटले आहे.

अशा आहेत सूचना -

  • अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन एकत्रितपणे शिवजंयती साजरी करतात. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आणि साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
  • दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी.
  • कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे.
  • आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण करावे.
  • करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

हेही वाचा-राज्यात सोमवारपासून कोरोना लसीचा दुसरा डोस

हेही वाचा-आमचं ठरलयं! महापौर शिवसेनेचाच, संजय राऊतांचा नाशिकमध्ये दावा

ABOUT THE AUTHOR

...view details